Patra Chawl Scam Case : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा (Patra chawl scam) प्रकरणात ईडीनं (ED) आज स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना ईडीनं स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत. 


मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. यापूर्वीही ईडीनं स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता. सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच आता स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीनंतर संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 


पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांचीही ईडीनं चौकशी केली होती. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती. आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय खुलासा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संजय राऊतांवर नेमके आरोप काय?


ईडीनं संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी थेट हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीनं केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असा आरोप ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. 


पत्रचाळ प्रकरण काय?


मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.