Anil Parab : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर ईडीने त्यांना मागील आठवड्यात चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी अनिल परब यांनी मंत्री असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते.


काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान, अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपाय यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा  आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत.  काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.  


शिवसेना लक्ष्य?


मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनिल परब हे मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेचे महत्त्वाचे रणनीतिकार समजले जातात. मुंबईतील वॉर्डमधील समीकरण अनिल परबांना चांगल्याच प्रकारे ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात धाडल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 


अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?


पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.