ठाणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कमी अधिक रुग्ण ठाणे शहरात दररोज आढळून येत आहेत. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंदीय पथकाने ठाणे शहरात येऊन पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी या पथकाने अनेक भागात भेटी दिल्या तसेच दुसऱ्या लाटेत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती परत करू नका, योग्य नियोजन करा अशी सूचना या पथकाने पालिका प्रशासनाला केल्या आहेत.


महाराष्ट्र राज्याचे कोविड-19 नोडल अधिकारी तथा गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ.अजित शेवाळे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासमवेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. तसेच कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील इतर महापालिकेने कोविड-19 चा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, यांच्यासह इतर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.  


ठाणे जिल्हा तिसऱ्या स्थरात मोडत असून विविध महापलिकेमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र एकीकडे या नियमाचे पालन होताना दिसत नसून दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत. त्यामुळे शहरात कश्या पध्दतीने काम सुरू आहे ? काय उपाययोजना राबविण्यात येत आहे ? याचा आढावा केंदीय पथकाने घेतला आहे. गुरुवारी सकाळी हे पथक ठाण्यात धडकले असताना सकाळपासून या पथकाने बैठका, पाहणी करून शहराची परिस्थिती लक्षात घेतली. कोरोना साथीच्या रोगावर नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न होत असताना नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.


मास्क हे कोरोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात अशी सूचना देखील यावेळी या पथकाने केली. गुरुवारी या पथकाने पार्किंग प्लाझा, ऑक्सिजन प्लांट, लसीकरण केंद्र तसेच वॉर रूम ची पाहणी केली. त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांशी शहराच्या परिस्थितीत बाबत चर्चा केली. प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी टीमवर्क ठेवावे, असे निर्देश पथकाने दिले असून पालिकेने केलेल्या उपयोजनेचे कौतुक केले.