मुंबई : पीएनबी घोटळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदी विरोधात तपास यंत्रणेने आपलं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणी मुंबईतील पीएमएलए कोर्टात ईडीने दाखल केलेलं हे तिसरं आरोपपत्र आहे. या नव्या आरोपपत्रात या प्रकरणातील आरोपींविरोधात अधिक भक्कम पुरावे, आजवर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे तपशील आणि अन्य काही बाबींचा उल्लेख आहे.

मे 2017 मध्ये नीरव मोदीविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचा मामा मेहुल चोक्सीविरोधातही तपासयंत्रणेने स्वतंत्र आरोपपत्र दाखल केलं.

गेल्या शनिवारी म्हणजेच 9 मार्चला इंग्लंडच्या गृह सचिवांना नीरव मोदीच्या हस्तांतरणाविषयीचं पत्र पोहचलं असल्याची माहीती यावेळी तपास यंत्रणेने हायकोर्टात दिली. भारतातून पसार झाल्यानंतर तो इंग्लंडमध्ये लपल्याची माहिती गेल्या वर्षीच समोर आली होती. काही दिवसांपूर्वी दाढी मिश्या वाढवून लंडनच्या रस्त्यांवर मोठ्या आरामात हिंडणारा नीरव मोदी समोर आल्यानं यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हिरे व्यापारी असलेल्या नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला सुमारे साडे अकरा हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. हे प्रकरण बाहेर येण्याआधीच त्याने आपल्या संपूर्ण परिवारासह या देशातून पलायन केलं आहे.