मुंबई : येत्या आठवड्याभरात भाजप-शिवसेनेनं जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही चौथी आघाडी स्थापन करु, असा इशारा रासप अध्यक्ष महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. युतीतील जागावाटपाचा तिढा अजुनही सुटला नाही, त्यामुळे मित्रपक्षातील नेते नाराज आहेत.
आघाडी असो किवा युती मोठे पक्ष लहानपक्षांना गृहीत धरतात, असा आरोप महादेव जानकर यांनी केला आहे. भरिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित आघाडी म्हणून तिसरी आघाडी तयार केली. जागा वाटपाचा तिढा सोडवला नाही तर आम्ही चौथी आघाडी स्थापन करु, असं महादेव जानकर म्हणाले.
आम्ही भाजप-सेनेकडे फक्त एक-एक जागा मागत असून यावर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा चौथ्या आघाडीसाठी आम्ही जुने मित्र नव्यानं एकत्र येऊ शकतो, असा सुचक इशारा महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला आहे. यावरुन युतीतील मित्रपक्षांची नाराजी समोर आली आहे.
महादेव जानकर माढा, सदाभाऊ खोत हातकणंगले आणि रामदास आठवले दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आग्रही आहेत. मात्र याबाबत अजुनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे युतीमध्ये जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे.
मागील निवडणुकीत महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदार संघ तर रामदास आठवले यांना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली होती. तर सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. मात्र तिघांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता.
त्यानंतर सदाभाऊ खोत, महादेव जानकर, यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्यात आलं. तर रामदास आठवले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री पद देण्यात आलं होतं. मात्र ही मंडळी सध्या जागावाटपावरुन नाराज आहे.
जागावाटापाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा चौथी आघाडी स्थापन करु, युतीतील मित्रपक्षांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2019 03:35 PM (IST)
येत्या आठवड्याभरात भाजप-शिवसेनेनं जागावाटापाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही चौथी आघाडी स्थापन करु, असा इशारा रासप अध्यक्ष महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -