नरेंद्र मोदी विजयी व्हावे यासाठी एकदिलाने मैदानात उतरा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. फक्त भाजपच नव्हे तर युतीतल्या शिवसेना किंवा इतर मित्रपक्षांना सोडलेल्या जागांवरही नरेंद्र मोदीच उमेदवार आहेत, असं गृहीत धरुन कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्रांनी कानमंत्र दिला.
'शरद पवारांची माघार हा युतीचा मोठा विजय आहे, देशांत मोदींना पाठिंबा देणारं वातावरण आहे. एकदा सभेत मोदी म्हणाले होते की, शरद पवार हवा का रुख भाप लेते है, यावेळी त्यांना हे समजलं असावं म्हणून पवारांनी माघार घेतली असावी” असा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आलेली असताना पदाधिकाऱ्यांची उत्सुकता वाढली आहे. त्यात पक्षात आयारामांचा कल जास्त असल्याने आयात उमेदवार माथी मारल्या जाण्याची चिंता या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत होती. यामुळे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कुचंबणा होत असल्याचा सूर आज कार्यकर्त्यांमध्ये उमटत होता. अशा परिस्थितीत आपला उमेदवार कोण असेल याची चिंता न करता प्रत्येक मतदारसंघात नरेंद्र मोदीच उमेदवार असल्याचा कानमंत्र मुख्यमंत्र्यांनी दिला.