मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) त्याला विरोध करत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं. त्याची दखल घेत न्यायालयानं यावर 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
29 डिसेंबर 2021 रोजी ईडीनं देशमुखांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केलं आहे. सुमारे सात हजार पानांचं हे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे. या आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत.
देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने 17 जानेवारी रोजी फेटाळून लावल्यानंतर आता देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, बुधवारी ईडीच्यावतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर कऱण्यात आले. ईडीने देशमुख यांच्यासोबतच सचिन वाझेच्या जामीन अर्जावरही आपली भूमिका मांडली आहे. त्यावर येत्या सोमवारी देशमुख आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्यावतीने युक्तिवाद कऱण्यात येणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तास चौकशी केल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. दुसरीकडे, या प्रकऱणात देशमुखांची दोन्ही मुलं ऋषिकेश आणि सलिल यांच्या नावाचाही सहभाग आरोपपत्रात करण्यात आला असून न्यायालयाने दोघांनाही समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha