मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. मनी लॉण्ड्रिंग (PMLA) प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाईल. अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असं समजतं.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. ज्यावेळी याबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा त्या खोलीत अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे देखील उपस्थित होते.


देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीचा छापा
ईडीने काल (25 जून) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील  जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागवून अगदी एक एक ड्रॉवर तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथून देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे जबाब घेतले. 


अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया


या छाप्यानंतर अनिल देशमुख म्हणाले की, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं. सत्य समोर येईल, अशी आशा आहे. भविष्यातही तपास यंत्रणांना सहकार्य करत राहू असंही देशमुख यांनी सांगितलं. देशमुख म्हणाले की, "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवलं." 


शरद पवार काय म्हणाले?
या कारवाईबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे की, "अनिल देशमुखांवरील ईडीचे छापे या गोष्टी नवीन नाहीत. याबाबत अधिक चिंता वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला यापूर्वी देखील यंत्रणेद्वारे त्रास दिला आहे. आणखी कुठे त्रास देता येईल का? यासाठी प्रयत्न सुरु आहेत."


शरद पवार म्हणाले की, सार्वजनिक जीवनातल्या एखाद्या राजकीय नेत्याबाबत दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने ठराव करण्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते. चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ आहेत. आम्हाला यात काही आश्चर्य वाटत नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, असं पवार म्हणाले. 


संबंधित बातम्या


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरी सव्वातीन तासानंतर ईडीचे तपासणी पूर्ण