नवी दिल्ली : मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या मुदद्यावरुन पुन्हा एकदा वादळ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अधिसूचना काढून इको सेन्सिटिव्ह झोनची मर्यादा कमीत कमी 100 मीटर तर जास्तीत जास्त 4 किमी पर्यंत आणलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्राच्या नोटिफिकेशनमध्ये आरे कॉलनीतल्या प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.


या कारशेडसाठी 1.65 चौरस किमीची जागा ही इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात आल्याचं स्पष्टपणे पत्रकात म्हटलं आहे. मेट्रोचा आरेमधला डेपो हा गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामधलाही वादाचा मुद्दा बनलेला होता. कारण
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही आरेत मेट्रो डेपो करण्यास विरोध केलेला होता.

पर्यावरणवादींनी उभ्या केलेल्या 'सेव्ह आरे' मोहीमेसही त्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या खासदारांचं शिष्टमंडळ यासंदर्भात पर्यावरणमंत्र्यांना भेटलेलं होतं. त्यानंतर आजच्या नोटफिकेशनमध्ये आरेच्या प्रस्तावित डेपोला हिरवा कंदील मिळाला आहे.

याशिवाय इको सेन्सेटिव्ह झोनची मर्यादा कमी करुन, त्यात नियम आणि अटींसह अनेक प्रकारची बांधकामेही करता येणार आहेत. त्यालाही पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :


नॅशनल पार्कचा इकोसेन्सिटिव्ह झोन आता 100 मीटरपर्यंतच!