आता ओला कॅबमध्येही पैसे काढता येणार, येस बँकेचा उपक्रम
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 05:54 PM (IST)
मुंबई : नोटाबंदीनंतर सुरु असलेल्या चलनतुटवड्याच्या समस्येवर ओला कंपनीनं उपाय शोधला आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या येस बँकेसोबत हातमिळवणी करत ओलानं ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ओला कॅबच्या माध्यमातून येस बँक मायक्रो एटीएम सुविधा आपल्या ग्राहकांना देणार आहे. त्यामुळे लोकांना बँकेसमोरच्या रांगेत उभं राहण्याचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. येस बँक आणि ओला कॅबनं सुरु केलेल्या या सेवेतून कोणत्याही बँकेच्या ग्राहकाला 2000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. कालपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यात पीओएस मशिनच्या माध्यमातून ग्राहकांना दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम सहजपणे काढता येणार आहे. येस बँक आणि ओलाच्या या उपक्रमाअंतर्गत देशभरातील 10 शहरांमध्ये एटीएम मशिन्स लावली जाणार आहेत. या मशिन्समधून 2000 रुपयेच काढता येणार असल्याची माहिती येस बँकेचे भारतातील प्रमुख रजत मेहता यांनी दिली आहे. ओला कॅबमध्येच पीओएस मशिन्स लावली जाणार आहेत. सध्या ही सुविधा दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद आणि जयपूरसह 10 शहरांतील 30 ठिकाणी उपलब्ध असेल.