मुंबई : राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे प्रत्येकी 22 टन वजनाच्या दोन ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या आहेत. आज दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. या तोफा अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या.


राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज संध्याकाळी, क्रेनच्या मदतीने तोफा उचलण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे परिरक्षण करण्याची सूचना केली आहे. या तोफांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन राज्यपालांनी नौदलाच्या तज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना राजभवनच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वे हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. त्यामुळे लोकांना तसेच इतिहासप्रेमींना या तोफा पाहता येणार आहेत.

राजभवन येथे प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच असलेल्या हिरवळीजवळ समुद्राच्या दिशेने तळाशी काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या दोन वजनदार तोफा दिसल्या. अनेक वर्षे या तोफा पडून राहिल्या असल्याने त्या पूर्णत: झाकल्या गेल्या होत्या.

या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन असून, लांबी 4.7 मीटर तर अधिकतम व्यास 1.15 मीटर इतका आहे. आज दोनीही तोफा क्रेनच्या मदतीने 50 मीटर उंच उचलण्यात आल्या आणि त्यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आल्या.

सन 2016 साली राज्यपालांच्या निवासस्थानाखाली सापडलेल्या भूमिगत बंकरच्या परीक्षणाचे काम एका तज्ज्ञ वास्तूविशारद फर्मच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. हे काम झाल्यानंतर त्याठिकाणी संग्रहालय निर्माण करून बंकर जनतेसाठी खुले करण्याचे राज्यपालांनी यापूर्वीच सूचित केले आहे.