मुंबई: सध्या सूर्यनारायण चांगलाच तापू लागला आहे. त्यामुळं साहजिकच लोक थंडपेयांकडे धाव घेत आहेत. मात्र मुंबईकरांनी जरा सावधान होण्याची गरज आहे.

कारण शहरात विविध ठिकाणी फेरीवाल्यांकडील बर्फ दूषित असल्याचं समोर आलं आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत चक्क विषाणू आढळून आले आहेत. बर्फाच्या नमुन्यातील 96 टक्के बर्फ खाण्यास अयोग्य असून 75 टक्के नमुन्यामध्ये ई कोलाय विषाणू आढळे आहे.

या विषाणूमुळं कावीळ, जुलाब , कॉलरा आणि विषमज्वर यासारख्या आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असते. विशेष म्हणजे गोवंडी आणि देवनार परिसरात फेरीवाल्यांकडील बर्फाच्या सर्वच नमुन्यात हे विषाणू आढळले आहेत.

शहरातील खाद्यपदार्थ, ज्यूस सेंटर, ऊसाच्या रसाचे दुकान, बर्फाचे गोळेवाले, लस्सी, ताक विक्रेते आदी फेरीवाल्यांकडील बर्फ दूषित असल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत दिसून आले आहे.

फेरीवाल्यांकडील पाण्याच्या 10 टक्के नमुन्यांमध्येही ई-कोलाय आढळला.