ठाणे : ठाणे पोलिसांनी कळव्यातून शनिवारी मध्यरात्री 10 लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, याप्रकरणी दशरथ प्रसाद भोलू याला अटक केली आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्यांमध्ये सर्वाधिक नोटा 2000 रुपयांच्या आहेत.
मुंब्रातील दशरथ भोलू हा अनेक दिवसांपासून बनावट नोटांची हेरफार करत असल्याची माहिती ठाणे पोलीस गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी रात्री 1.35 च्या सुमारास गुन्हे शाखेने सापळा रचून दशरथ भोलू याला कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालय येथून अटक केली.
यात भोलूकडून 10 लाख 74 हजार रकमेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यात सर्वाधिक नोटा 2000 रुपयांच्या म्हणजे 537 नोटा होत्या. दरम्यान, प्रकरणात अजून कितीजण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.