मुंबई : राजकीय पंडित आणि विश्लेषकांची उत्सुकता शिगेला ताणणारी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक, कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय उरकण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबईच्या 3 दिवसीय दौऱ्यावर असलेले अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मातोश्रीवर दाखल झाले. मात्र शेतकऱ्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रावसाहेब दानवेंना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मातोश्री बंगल्याच्या वरच्या मजल्यावर अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या चौघांमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र अमित शाह यांनी उमेदवाराचं नाव जाहीर न करता, मोदी जे नाव घोषित करतील त्याला पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंना केल्याचं समजतं.

उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपच्या भूमिकेला आक्षेप घेतला. भाजपने आधी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असतील, त्यांचं नाव जाहीर करावं. मग आम्ही आमची भूमिका सांगू असं उद्धव यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत किंवा डॉ. स्वामीनाथन यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्यामुळे एनडीएच्या इतर घटकपक्षांप्रमाणे मोदी जाहीर करतील त्या नावाला शिवसेना पाठिंबा देणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.