मुंबई : तोंडावर आलेल्या दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत तब्बल पाच लाख रूपये किंमतीचं एकूण 19 हजार लीटर दूध जप्त करण्यात आलंय. एकूण तपासणी केलेल्या 13 नमुन्यांपैकी पाच नमुने असलेलं दूध परत पाठवण्यात आलं. इतर आठ नमुन्याचं दूध अन्न व औषध प्रशासनाने नष्ट करत कारवाई केली आहे.


बुधवारी पहाटे मुंबईत येणाऱ्या पाचही प्रमुख चेक नाक्यांवर करण्यात आलेल्या तपासणीत  227 वाहनांची तपासणी करण्यात आली. या एकूण तपासणीच्या वेळी 9 लाख 22 हजार लीटर दूध तपासण्यात आलं. या दुधापैकी एकूण 13 दूधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. या नमुन्यांपैकी पाच नमुने मानदानुसार नसल्याची बाब उघड झाली.

यानंतर एक लाख 30 हजार 996 रूपये किमतीचं 3 हजार 444 लीटर दूध पुनर्प्रक्रियेसाठी उत्पादकाकडे परत पाठवण्यात आलं. तर उर्वरित आठ नमुन्यामध्ये मेल्टोडेक्स्ट्रीन, सुक्रोस किंवा अमोनियम सल्फेट असल्याचं आढळून आलं. त्यामुळे आठ नमुने घेऊन राहिलेल्या उर्वरित दुधाचा 5 लाख 71 हजार 300 रूपयांचा 19 हजार 250 लीटरचा साठा जप्त करण्यात आला. पुढे हाच साठा नवी मुंबई महापालिकेच्या प्रक्रिया केंद्रात नेऊन नष्ट करण्यात आला.

मुंबईत भेसळयुक्त दुधाच्या कारवाईनंतर सापडलेल्या नमुन्याच्या आधारे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या हेरिटेज फूड लिमिटेड या कंपनीवर कारवाई करण्यात आली. यात 898 लीटर दूध आणि 12 हजार 924 किलो दूध भुकटी जप्त करण्यात आली.

याची एकूण किंमत अनुक्रमे 42 हजार 206 रूपये आणि 17 लाख 44 हजार 740 इतकी आहे. या कारवाईतील भेसळयुक्त दुधाची जागच्या जागीच विल्हेवाट लावण्यात आली आहे.