ठाणे : ठाणे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी राबवलेल्या सर्व योजना फसल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नवा मार्ग शोधून काढला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


ठाणे स्थानक परिसरासह शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यात येईल. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे स्थानक परिसरात काही महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरण मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर या भागात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या आहेत. तसंच ठाणे स्थानक परिसरातले रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे पादचाऱ्यांना चालणं शक्य होत नाही.

फेरीवाल्यांमुळे ठाणे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकेने अनेक योजना राबवल्या. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षकांची नेमणूक करुनही या भागात फेरीवाल्यांचा वावर कमी झालेला नाही.

सर्वच योजना फसल्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी आता ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे ठाणे स्थानकासह विविध भागात असलेल्या फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यात येईल.