मुंबई : नदी-नाल्यांच्या स्वच्छतेसह रस्ते, पदपथ यांची कामेदेखील निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना तसेच प्रत्येक विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना काल हे निर्देश दिले.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांतून गाळ काढून नाला प्रवाही करण्यासाठी कामे सुरु आहेत. तसेच विभाग कार्यालयांमार्फत संबंधित विभागाच्या कार्यक्षेत्रातील छोट्या नाल्यातील गाळ काढण्याची कामे सुरु आहेत.
कोविड 19 कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व कर्मचारी, कामगार यांना जॅकेट, गमबूट यांच्या सोबतीने मास्क, हातमोजे इत्यादी साधनांचा पुरवठा संबंधित कंत्राटदारांमार्फत केला जात असून सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी जास्तीत संयंत्रे उपलब्ध करुन कामे करण्यात येत आहेत. सर्व कामे ठरवलेल्या मुदतीत पूर्ण होतील, याचा विश्वास असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीच्या तीन प्रमुख रुग्णालयांसाठी तीन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, नालेसफाईची कामे करताना काही कंत्राटदारांनी अल्पवयीन मुलांना नेमल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या असून त्यावर एका आठवड्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहितीदेखील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सर्व कामांचा सविस्तर तपशील जाणून घेतल्यानंतर आयुक्त चहल म्हणाले की, नदी-नाले यामधील गाळ काढण्याची कामे करताना करताना अडथळ्यांची मुख्य ठिकाणे (बॉटलनेक) तातडीने व एका आठवड्यात स्वच्छ होतील, याकडे लक्ष द्यावे.
मिठी नदीचे काम 60 टक्के पूर्ण
मिठी नदीचे काम 60 टक्के पूर्ण झाले असल्याची बाब समाधानकारक आहे. पर्जन्यवृष्टीच्या कालावधीत मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडणार नाही, अशा रितीने आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली पाहिजेत. लहान नाल्यांच्या कामांवर संबंधित परिमंडळांच्या उपायुक्तांनी विशेष लक्ष द्यावे. कामांचा वेग वाढवण्यासाठी आणि निर्धारित वेळापत्रकानुसार गाळ काढण्यासाठी गरज पडल्यास अतिरिक्त यंत्रणा नेमावी. नालेसफाईप्रमाणेच रस्ते बांधकाम, रस्ते दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती यांची सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. कोणत्याही स्थितीत पावसाळा प्रारंभ होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश आयुक्त चहल यांनी दिले.
Lockdown 4.0 | मच्छिमार कॉलनीत नियमबाह्य मासेविक्रीला विरोध; शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांचं आंदोलन