मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसाठी तीन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायर रुग्णालयासाठी मदन नागरगोजे, केईएम रुग्णालयासाठी अजित पाटील, तर शीव येथील लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयासाठी बालाजी मंजूळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांच्या अधिक प्रभावी देखरेख आणि व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्य सचिव अजय मेहता यांनी केली आहे. या अधिकाऱ्यांना त्यांचे राज्य शासनातील काम सांभाळून रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचे काम तात्पुरत्या स्वरूपात बघावयाचे आहे, असेही संबंधित आदेशात नमूद करण्यात आले आहे.


या नवनियुक्त अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतली. महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयाची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, ते मदन नागरगोजे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2007 च्या बॅचचे अधिकारी असून ते सध्या राज्य शासनात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत.


केईएम रुग्णालयाचे व्यवस्थापकीय जबाबदारी सोपवण्यात आलेले अजित पाटील हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2007 च्या बॅचचे अधिकारी असून ते सध्या महा-आयटी महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.


तर सध्या राज्य शासनाच्या नियोजन विभागात उपसचिव पदावर कार्यरत असणारे बालाजी मंजुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष 2009 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांच्याकडे शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.


मुंबईतील जी. टी. रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालय, या राज्य शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष 2011 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.


Sion Hospital | सायन रुग्णालयात दीड महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया