मुंबई : ' मौत तो सबको आनी है एक बार ! पर जो मौत को हरा दे, वही जिंदगी है.. !! ही कहाणी आहे मुंबईतील के.ई. एम ( KEM) हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ दिपाली पुरी यांची... गेल्या दोन महिन्यापासून ज्या डॉ. दिपाली यांनी कोरोनापासून रुग्णांची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करत होत्या. त्याच डॉ. दिपाली यांना अखेर कोरोनाने गाठलं. मनात अनेक प्रश्न, अनेक शंखा निर्माण झाल्या होत्या, मात्र दिपाली यांनी मोठ्या जिद्दीने कोरोनासोबत दोन हात करत अखेर कोरोनाला हरवलं. आता पुन्हा दिपाली रुग्ण सेवेसाठी के. ई. एम मध्ये दाखल झाल्या आहेत.


डॉ. दिपाली चंद्रकांत पुरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे एम.बी.बी.एस. शिक्षण घेतले आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून मागील वर्षापर्यंत नोकरी केली आणि पी.जी. साठी अभ्यास केला. मुंबई येथे पी.जी. साठी सिलेक्शन झाले. सध्या सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि के. ई.एम मुंबई इथे कम्युनिटी मेडिसिन विभागात ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टर म्हणून काम करत आहे.


डॉ. दीपाली पुरी यांनी 23 ते 27 मार्च 2020 पर्यंत कोविड19 साठी ड्युटी केली. परंतु नंतर त्यांना कोविड ड्युटी ऐवजी IDSP मध्ये पोस्टिंग दिली होती. तिथे महिनाभर काम केले. 1 मे 2020 च्या पहाटे 2 वाजता डॉ. दीपाली यांना अचानक ताप आणि थंडी वाजून आली. मग त्यांनी मैत्रीण डॉक्टर शिल्पा नेल्लीकल हिला फोन केला. शिल्पा जागी होती. क्षणाचाही विलंब न करता थर्मामिटर आणि पॅरासिटामोल टॅबलेट घेऊन सर्जिकल मास्क लावून डॉ. दीपाली यांच्या रूम मध्ये आल्या. आधी डॉ. दीपालीने फॅन बंद करायला लावला, तेव्हा थोडी थंडी कमी झाली. डॉ. दीपाली तापाने फणफणत होत्या. त्यांना 105 ताप होता.



कोविड 19 पँडेमिकमुळे के.ई. एम. च्या कॅज्युएल्टी मध्ये कोरोनाचे बरेच रुग्ण असतात. त्यामुळे डॉ. दीपाली यांच्यावर कॅज्युएल्टी मध्ये न ठेवता हॉस्टेलवरच ट्रीटमेंट सुरु केली. डॉक्टर शिल्पा यांनी पॅरासिटामोल टॅबलेट दिली आणि स्पॉंगिंग्ज स्टार्ट केलं. 20 मिनिटानंतर ताप थोडा कमी झाला. डॉ. शिल्पा यांनी आराम करायला सांगितलं. डॉ. दीपालीच्या स्वॅब टेस्ट करणं गरजेचं होत. के. ई . एम द्वारा कोविड 19 स्क्रिनिंग साठी 24*7 कफ कोल्ड फेव्हर ओपीडी चालू करण्यात आली. तिथे स्वॅब घेण्यात आला. 3 मे ला रात्री 9 च्या सुमारास डॉक्टर अमित भोंडवे यांचा कॉल आला. डॉ. दीपाली यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. हे ऐकून डॉ. दीपालीच्या जणू पायाखालची जमीनच सरकली होती आणि अर्ध्या तासात त्यांना अॅम्ब्युलन्स घ्यायला आली. अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर ने पीपीई किट घातलेली होती.


आयुष्यात डॉ. दीपालीने खूप वेळा अॅम्ब्युलन्सने प्रवास केला होता, पण डॉक्टर म्हणून. पण आज त्या स्वतःच एक रुग्ण होत्या. अॅम्ब्युलन्समध्ये बसल्यावर मात्र डॉ. दीपाली यांच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होतं. कोविड 19 मुळे त्रास वाढला तर काय होईल ? असे अनेक विचार डॉ. दीपाली यांच्या मनात येत होते. त्यांनी आई वडिलांनाही बातमी न सांगत यांचे आतेभाऊ डॉ. रामेश्वर पुरी हे बुलढाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. ते मेडिको असल्यामुळे ही बातमी त्यांना सांगितली. त्यांनी धीर दिला. तेव्हा त्यांच्या मनावरील ताण कमी झाला. डॉ. दीपाली यांना अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आलं. या 7 दिवसात डॉक्टर ऋजुता यांनी डॉ. दीपालीला प्राणायाम करून सकारात्मक राहायला सांगितलं.


" तू लवकर बरी होशील बेटा "मॅमचे हे वाक्य ऐकून डॉ. दीपाली यांना खूप बरं वाटायचं. लवकर निदान झाल्यामुळे लवकर उपचार सुरु झाले. हळूहळू चेस्ट टाईटनेस कमी झाला. ताप ही कमी झाला आणि SPO2 94 हून 98-99 वरती आलं. पाच दिवसात डॉ. दीपालीची सगळी लक्षणे हळूहळू कमी झाली. अॅडमिशनच्या दुसऱ्या दिवशी छातीचा एक्स रे, ईसीजी आणि स्वॅब चेक केला होता. दोन्ही पण नॉर्मल असल्या मुळे डॉ. दीपाली यांचं अर्ध टेन्शन गेलं होत. स्वॅबचा रिपोर्ट दोन दिवसानंतर निगेटिव्ह आला, असं कळल्या नंतर डॉ. दीपाली यांना खूप आनंद झाला.


नवीन गाईडलाईन नुसार एक स्वॅब निगेटिव्ह वरती डिस्चार्ज देण्यात येणार होता. 7 दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला आणि 14 दिवस होम क्वारांटाईनचा शिक्का हातावर मारण्यात आला. सुट्टी मिळणार हे ऐकल्यावर डॉ. दीपाली यांनी आई -वडिलांना ही बातमी सांगितली. दोघांना पण खूप काळजी वाटत होती. पण त्याच वेळी ते आनंदीपण होते, कारण पोटच्या लेकीला डिस्चार्ज मिळाला होता. आता डॉक्टर दिपाली या पुन्हा के. ई.एम हॉस्पिटल मध्ये आपल्या सेवेत रुजू झालेल्या आहेत. मन शांत ठेवून आणि योग्य आहार आणि वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टर दिपाली यांनी अखेर कोरोनाला हरवलं .


डॉ.दिपाली पुरी म्हणाल्या, "आपल्यात कोविड 19 चे एक जरी लक्षण असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकर निदान आणि लवकर उपचार झाले तर माझ्या सारखेच तुम्ही सर्वजण पण कोविड 19 ला हरवू शकता. आपल्यात कोरोनाची लक्षणे दिसायला लागल्या नंतर आणि आपल्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेतल्यानेच मी कोरोना वर मात करू शकले".


कोरोनाची लागण होऊ नये किंवा झाल्यास घ्यावयाची काळजी




  • कोमट पाणी भरपूर प्या.

  • मिठाने गुळण्या करा .

  • भरपूर जेवण करा.

  • ताज्या फळांचे सेवन करा. 

  •  श्वासोश्वासाचे व्यायाम - प्राणायाम करा.

  • पॉझिटिव्ह विचार करा.

  • हात आणि शरीराची स्वच्छता करा.