बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. भन्साळी कालपासून चिंतेत आहेत. कारण त्यांचे सहकारी डॉ. दीपक अमरापूरकर कालपासून बेपत्ता आहेत. अमरापूरकर काल सकाळी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी दैनंदिन सगळी कामं केली. पण दुपार होताहोता पावसाचा जोर वाढला. पाणी साचल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे डॉ. अमरापूरकरांनीही घराकडे धाव घेतली.
लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकरांचा विचार होता. त्यांनी गाडी सोडून दिली. गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत.
लोअर परेलमधील काही निकटवर्तींयांच्या माहितीनुसार अमरापूरकर जवळच्या मॅनहोलमध्ये कोसळले. पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी मॅनहोलचं झाकण काढलं होतं. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले.
डॉ. दीपक अमरापूरकर यांची ओळख
डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे आहेत. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख आहे. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं.
मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख आहेत. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत. गेल्या 24 तासांपासून अमरापूरकरांच्या शोधासाठी कुटुंबीय, निकटवर्तीय आणि पोलीस प्रयत्न करत आहेत.
मुंबईत कालच्या पावसाने आपल्याकडून काय काय हिरावून घेतलंय याची अजून गणतीही सुरु झालेली नाही. त्याआधी अमरापूरकरांचं बेपत्ता होणं चटका लावणारं आहे.
संबंधित बातम्या :