मुंबई : मुंबईसारख्या शहरात मॉलमध्ये आपल्या बाळांना घेऊन जाणाऱ्या महिलांना स्तनपानासाठी एक खोली किंवा जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनी केली आहे.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनी मुंबई महापालिका याबाबत आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुंबईसारख्या शहरात देखील जिथे नोकरीवर जाणाऱ्या महिलांची किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या महिलांची संख्या जास्त असताना स्तनपनासाठी जागा नसल्याची बाब समोर आली आहे.
डॉ. भारती बावधने, माजी शिवसेना नगरसेविका
ऑस्ट्रेलियन सिनेटर लॅरी वॉटर्स यांनी नुकतंच तिथल्या संसदेत आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला स्तनपान देत कामकाजात सहभाग घेतला. याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आणि सर्व थरातून त्यांच कौतुक झालं.
आज प्रगत देशात या गोष्टीचं कौतुक होत असताना मुंबईसारख्या आंतराष्ट्रीय शहरात महिलांना सार्वजनिकरित्या स्तनपान देणं कठीण जातं. अगदी मुंबईसारख्या शहरात मॉलमध्ये देखील स्तनपानासाठी वेगळी सोय नसल्याची बाब समोर आली आहे.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनी मुंबईतल्या एका मॉलमध्ये स्तनपान देणाऱ्या, पण अवघडल्या अवस्थेत असलेल्या महिलेला पाहिलं आणि मुंबई महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिलं.
महाराष्ट्रात एसटी महामंडळाने स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार केले. पण मुंबईत मॉलसारख्या ठिकाणी अशी सुविधा नाहीत. महिलांना आडोसे शोधावे लागतात किंवा शौचालयात आडोस्याला जावं लागतं.
स्तनपान ही बाळाची आणि आईची अत्यंत महत्वाची गरज आहे. वेळेत स्तनपान न दिल्यास फक्त बाळाची गैरसोय होत नाही तर आईच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात, असं असताना मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्तनपानासाठी एका वेगळ्या खोलीची जागेची गरज आहे. एकीकडे सार्वजनिकरित्या स्तनपान करण्यासाठी जगात चळवळ उभी राहत असताना भारतात या साध्या गरजेसाठी सरकार किंवा महापालिका प्रशासनाकडे जाण्याची वेळ आली आहे.