मुंबई : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीने जेल प्रशासनावर केला.


भायखळा जेलप्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन कोर्टासमोर साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीनं कोर्टासमोर केला आहे. गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणींनं कोर्टासमोर सांगितलं.

“भायखळा जेलमधल्या घटनेनंतर जेल प्रशासनाने महिला कैद्यांवर लाठीचार्जचे आदेश दिले होते. तेव्हा लाठीचार्जसाठी महिलांसह पुरुष स्टाफही सहभागी झाला होता.”, अशी माहितीही इंद्राणी मुखर्जीने कोर्टात दिली.

यावेळी इंद्राणीने आपल्या उजव्या हातावरील मारहाणीचे व्रणही कोर्टासमोर दाखवले. त्यानंतर, इंद्राणीला तक्रार दाखल करायची असल्यास संबंधित पोलिस स्टेशनला न्यावं, अशी कोर्टाने सूचना दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भायखळा जेलमध्ये महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.