मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कात पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर भीमअनुयायांनी गजबजून गेला आहे.

दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी लाखो भीमसैनिक बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दाखल होतात. मात्र यंदा ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने शिवाजी पार्कात चिखल झाला आहे. तरीही भीमसैनिकांचा शिवाजी पार्ककडे येणारा ओघ मात्र सुरुच आहे.

दुसरीकडे महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला ओखी वादळाच्या रुपानं भीमसैनिकांसमोर संकट उभं राहिलं होतं. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे महिपालिकेने शिवाजी पार्कात बांधलेला मंडप कोसळून काही जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आला.

दरम्यान महापालिकेतर्फे भीमसैनिकांसाठी मोठ्या सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत.



70 शाळांमध्ये राहण्याची सोय
ओखी वादळ आणि पावसामुळे परिस्थिती बिकट झाल्याने मुंबईबाहेरुन आलेल्या अनुयायांची राहण्याची सोय यंदा शिवाजी पार्कमधील शेल्टरऐवजी महापालिकेच्या 70 शाळांमध्ये करण्यात आली आहे.

बेस्टच्या अतिरिक्त बस
चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी मात्र जास्त असल्याने त्यांच्या सोयीसाठी शिवाजी पार्क परिसरात खासगी बस, बेस्ट बस सोडण्यात येत आहेत.

दादर चौपाटीवर जाणारे सहा मार्ग बंद
– दक्षतेसाठी दादर चौपाटीवर जाणारे सहा मार्ग बंद करण्यात आले आहेत. या सहा रस्त्यांमध्ये किर्ती कॉलेजचा रस्ता, सेना भवन चौकातून जाणारा रस्ता, महापौर बंगल्या शेजारचा रस्ता, तसंच इतर तीन गल्ल्यांचा समावेश आहे.
– तसंच दादर चौपाटीवरील सर्व दुकानंही हटवली आहेत.
– शिवाजी पार्क व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथे तात्पुरत्या निवाऱ्यासह फिरती शौचालयं, स्नानगृहं आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.



कडेकोट पोलिस बंदोबस्त
महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दादरचा समुद्रकिनारा पोलिसांनी वेढलेले आहेत. तसंच किनाऱ्यावर फेन्सिंगही टाकण्यात आलं आहे.

- याशिवाय नेव्ही, कोस्ट गार्ड, एनडीआरएफसह मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल सज्ज झालं आहे.

इथे वाहनांच्या पार्किंगला बंदी
एस. व्ही. एस. रोड
रानडे रोड
एन. सी. केळकर रोड
केळुस्कर रोड (दक्षिण), केळुस्कर (उत्तर)
गोखले रोड, दक्षिण व उत्तर
टिळक ब्रीज
भवानी शंकर रोड
एस. के. बोले मार्ग.
सेनापती बापट मार्ग
फाइव्ह गार्डन्स, माटुंगा
माहिम रेती बंदर

संबंधित बातम्या

महापरिनिर्वाण दिनावर ओखीचं सावट, पावसामुळे शिवाजी पार्कात चिखल

शिवाजी पार्कातील मंडप कोसळला, काही भीमसैनिक जखमी

लई मजबूत भीमाचा किल्ला



भीमसैनिकांसाठी महापालिकेची सोय