मुंबई : लग्न म्हटलं की, लाखो रुपयांची उधळण आलीच. परंतु अनेक जण पैशांची उधळण न करता, लग्न करतानादेखील सामाजिक भान जपतात. असेच एक उदाहरण मुंबईत पहायला मिळाले आहे. मुंबईतील कोमल कानिटकर ही डॉक्टर तरुणी विवाह करत आहे. या विवाहानिमित्त तिने तिच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना "लग्नात आहेर नको, अवयव दान करा" असे आवाहन केले आहे.


नुकतेच आपण काही विवाहसोहळे पाहिले, ज्यामध्ये लाखो रुपयांची उधळण करण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने इशा अंबानी- आनंद पिरामल, रणवीर-दीपिका, मग प्रियंका-निकच्या लग्नांचा उल्लेख करावा लागेल. परंतु मुंबईतल्या या डॉक्टर तरुणीने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

डॉ. कोमल कानिटकर हिने तिच्या पत्रिकेत आहेराऐवजी अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात तब्बल 5 हजार 561 रुग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. याचाच गांभिर्याने विचार करत डाँक्टर कोमलने तिच्या लग्नात आहेराऐवजी अवयव दान करण्याची मागणी केली आहे.

आशिया खंडातील सर्वात महागडं असं पिरामल - अंबानींच्या आलिशान लग्न सोहळ्याने आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधले. परंतु आता मुंबईत एक असं आगळं - वेगळं लग्न पार पडत आहे. ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत. लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यापेक्षा समाजात सकारात्मक पायंडा पाडणारे उपक्रम करायला हवेत, असे मत डॉ. कोमलने व्यक्त केले.