फक्त मुंबईच नव्हे तर अगदी परदेशी पाहुणेही 'लालबागचा राजा'चा थाट बघण्यासाठी गर्दी करतात. अवघ्या पाच दिवसात 'लालबागचा राजा'च्या चरणी दोन कोटी 64 लाखांचं दान जमा झालं आहे.
एका भक्ताने राजाला एक किलो 271 ग्रॅमची हिरेजडीत सोन्याची मूर्ती अर्पण केली आहे. महत्वाचं म्हणजे अजूनही मोजदाद बाकी आहे. खजिनदार मंगेश दळवी यांनी ही माहिती दिली आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कालच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं होतं. तर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही सपत्नीक आज सकाळी दर्शनाला आला होता.
याशिवाय राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेही बाप्पा चरणी लीन झाले. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते.
मुंबईतील लालबाग परिसरात 'लालबागचा राजा'चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागते. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हेतू साध्य करताना दिसत आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्यात चार दिवसात तब्बल 135 मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.