अनाथाश्रमाला दान करा, तरच जामीन, बारबालांवर पैसे उधळणाऱ्या 47 जणांना कोर्टाची अट
एबीपी माझा वेब टीम | 25 Mar 2019 10:32 AM (IST)
आरोपींना एक लाख 41 हजार रुपयांची रक्कम पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यास सत्र न्यायालयाने सांगितलं आहे. त्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून आरोपींची सुटका होईल.
मुंबई : जामीन हवा असेल, तर अनाथाश्रमाला दान करा, अशी अट सत्र न्यायालयाने डान्स बारमध्ये पकडलेल्या 47 जणांना घातली. बदलापुरातील अनाथाश्रमाला प्रत्येकी तीन हजार रुपये दान करण्यास कोर्टाने सांगितलं. मुंबईतील हाजी अली परिसरात असलेल्या 'इंडियाना रेस्टॉरंट अँड बार'मध्ये शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकली. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या वर्षीच परवाना रद्द झालेल्या या बारमधून 47 जणांची धरपकड करण्यात आली होती. डान्स बारमध्ये आठ बारबाला आरोपींच्या अत्यंत जवळ नाचत होत्या, अश्लील हावभाव करत गाणं गात होत्या, तर ग्राहकही त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचं पोलिसांना आढळलं. सत्र न्यायालयाने अशाप्रकारचा आदेश देण्याची पहिलीच वेळ असल्याचं मानलं जात आहे. आरोपींना एक लाख 41 हजार रुपयांची रक्कम पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून आरोपींची सुटका होईल. ही रक्कम बदलापुरातील 'सत्कर्म बालक आश्रमा'त दान करण्यात येणार आहे.