डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसी (Dombivli MIDC) भागात असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या (ICICI Bank) तिजोरीतून 12 कोटी रुपये लंपास करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला पकडण्यात अखेर मानपाडा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार बँक कस्टोडियन अल्ताफ शेखसह त्याची बहिण निलोफरला अटक करण्यात आले आहे. मनी हाईस्ट वेबसीरिज पाहून त्याने बँकेतील सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी हेरल्या आणि संधी मिळताच डाव साधला.
जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून बारा कोटींची रक्कम चोरी झाल्याची घटना उघड झाली होती. एका प्रसिद्ध बँकेतून इतकी मोठी रोकड चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. या बँकेत काम करणाऱ्या कॅश मॅनेजर अल्ताफ शेख याने आपल्या काही साथीदारांसह ही रक्कम चोरली होती .पोलीस या टोळीच्या मागावर होते. या प्रकरणात पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना ऑगस्टमध्ये अटक केली मात्र अल्ताफ पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हते. मानपाडा पोलीस त्याच्या मागावर होते. अटक केलेल्या तिघांकडून धक्कादायक माहिती समोर आली .
अल्ताफ शेख याने मनी हाईस्ट (Money Hiest) ही वेब सीरिज पाहून त्याला चोरीची कल्पना सुचली. त्याने झटपट श्रीमंत होण्याचा नादात स्वतः काम करत असलेल्या बँकेत चोरीचा प्लॅन आखला. तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेविषयी सर्व माहिती होती. बँकेच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये असलेली कमतरता त्याने हेरली. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी त्याने त्याचे मित्र इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी यांची मदत घेतली. त्याने बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम सुरू असलेले पहिले आणि त्याने संधी साधली. अगोदर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला आणि नंतर चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केले.
9 जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून त्याने तिजोरीतून 34 कोटी रुपये लंपास केले. हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले. यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे त्याने आपल्या कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी नावाच्या तीन मित्रांना बोलवून 34 कोटींपैकी सुमारे 12 कोटी त्यांच्याकडे सोपवले. मात्र उरलेले पैसे त्याला घेता आले नाहीत. या दरोड्याचा गुंता सोडवण्यात अखेर मानपाडा पोलिसाना यश आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना अटक करत 5 कोटी 80 लाखांची रोकड जप्त केली होती .मात्र अल्ताफ शेख उर्वरित रक्कम घेऊन पसार झाला होता .अखेर या प्रकरणी पोलिसांनी तीन महिन्यांपासून चकवा देणाऱ्या अल्ताफ शेख याला कोल्हापूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. अल्ताफ शेख याची बहीण निलोफरला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अल्ताफने रोकड नवी मुंबई भागातील एका बंद इमारतीमध्ये लपवून ठेवली होती. आतापर्यंत नऊ कोटी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रोकड ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे