डोंबिवली  : लोकार्पण करून 48 तास उलटत नाहीत तोच डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर पुलावर खड्डा पडल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेत हा खड्डा बुजवला असला तरी विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे.


डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा कोपर पूल रेल्वेने धोकादायक जाहीर केल्यानंतर 15 सप्टेंबर 2019 रोजी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असले तरी चार वेळा निविदा प्रसिद्ध करूनही या पुलासाठी ठेकेदार मिळत नसल्याने पुलाचे काम सुरु होऊ शकले नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाच्या मदतीने पालिका प्रशासनाने पुष्पक रेल कॉर्पोरेशन या ठेकेदाराला पूल उभारणीचे काम देत एप्रिल 2020 रोजी पुलावर हातोडा मारत तातडीने पूल उभारण्याचे काम सुरु केले. यानंतर कामगाराचा तुटवडा, वेल्डिंगसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा अभाव, महावितरणच्या केबल्स, मुसळधार पाऊस यासारख्या समस्येवर मात करत प्रशासनाकडून पुलाचे काम 1 वर्ष 4 महिने या कालावधीत पूर्ण करण्यात आले. 


काम पूर्ण होताच 7 सप्टेंबर रोजी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे लोकार्पण करत गणेशोत्सवापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र लोकापर्णला 48 तास उलटत नाहीत तोच या पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. पुलावर पडलेला  खड्डा सोशल मीडियावर भलताच ट्रोल झाला. शहरातील रस्ते खड्ड्यांनी पोखरले असले तरी नव्याने तयार करण्यात आलेल्या पुलावर देखील खड्डा पडल्याने नागरिकांनी पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.


तर ही माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीने खड्डा बुजविण्यात आला आहे.दरम्यान याबाबत बोलताना शहर अभियंता सपना कोळी यांनी नागरिकाची गैरसोय होऊ नये यासाठी पुलाचे काम युद्धपातळीवर काम पूर्ण करत नागरिकांच्या मागणीनुसार हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलावर मास्टिक अस्फाल्टचा एक थर देण्याचे काम शिल्लक असून लवकरच हे काम केले जाणार असल्याचे सांगितले. 


जी तत्परता कोपर पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी दाखवली त्याच तत्परतेने इतर खड्डे बुजवा : मनसे आमदार राजू पाटील


कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याची दुपारच्या सुमारास मनसे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली .यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्याची चर्चा केली . त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लोकार्पणानंतर 48 तासात पुलावर खड्डे पडण्याची ही पहिलीच घटना असेल ,हा पूल गणेशउत्सवा पूर्वी सुरू करण्याची मागणी केली जात होती आमची देखील ही मागणी होती त्यामुळे हा पूल खुला केला हे मान्य ,त्यानुसार पूल सुरू केला. पुलावरील एक कोटच काम शिल्लक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र हे काम पावसाने उसंत घेतल्यानंतर करायचं होतं मात्र ते केलं नाही ,या खड्ड्याची माहिती मिळताच पालिकेने ज्या तत्परतेने हा खड्डा बुजवला तीच तत्परता शहरातील खड्डयाबाबत दाखवावी असा टोला लगावला