डोंबिवली : डोंबिवलीतल्या पोलिसाचा एक अजब कारनामा समोर आला आहे. या पोलिसानं एक दोन नव्हे, तर तब्बल सात महिलांशी लग्न करत त्यांची फसवणूक केली आहे.

सुर्यकांत कदम असं या पोलिसाचं नावं असून ते मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. या प्रकरणी त्यांच्या दुसऱ्या पत्नीने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं. विशेष म्हणजे, कुटुंबातील वाद किंवा पती-पत्नीतील कलह सोडवण्यासाठी पोलिस खात्याने स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत, मात्र याच खात्यात असलेल्या कदमांनी हा कारनामा केला.

1986 साली सुर्यकांत कदमांनी पहिलं लग्न केलं. मात्र त्यानंतर पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेताच 1992 मध्ये त्यांनी मंदिरात दुसरं लग्न केलं. यानंतर अशाच प्रकारे त्यांनी तब्बल सात लग्नं केली.

सातपैकी दोघींचं निधन झालं आहे. त्यांचं शेवटचं लग्न 2014 साली झालं असून तेव्हापासून ते सातव्या पत्नीसोबतच राहत आहेत. पोलिस दलाची प्रतिमा डागाळत असल्याचा ठपका ठेवत त्यांचं पोलिस दलातून निलंबन करण्यात आलं.

पोलिस उपायुक्तांनी निलंबनाची कारवाई केली असली, तरी गेल्या 30 वर्षांत सात जणींच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कदमांविरोधात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे.