कल्याण : महिलांचे केस कापले जाण्याचं लोण मुंबईत येऊन ठेपलं आहे. भिवंडी पाठोपाठ आता डोंबिवलीतही महिलेचे केस कापले गेल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या राजकुमारी बाबरिया या महिलेची वेणी अज्ञातानं कापल्याचा आरोप आहे.


भिवंडीत अशाप्रकारच्या तीन घटना झाल्यानंतर डोंबिवलीतली ही आठवड्यातील चौथी घटना ठरली आहे. डोंबिवली जवळच्या पिसवली ढोकली परिसरात एका विवाहित महिलेचे केस कापल्याची घटना सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

वेणी कापणारी चेटकीण समजून आग्य्रात वृद्धेची हत्या


राजकुमारी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर बेडरुमध्ये झोपल्या होत्या. त्यांची मुलगी शालिनी शेजाऱ्यांसोबत इमारतीच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. तेव्ही तिने दाराला बाहेरुन कडी घातली होती. अचानक ओरडण्याचा आवाज आला, तेव्हा बंद दाराची कडी उघडून मुलीने आत प्रवेश केला. तेव्हा तिची आई राजकुमारी बेशुद्धावस्थेत पडली होती.

वेणी कापण्याचं लोण भिवंडीत, आरोपी अज्ञात, कारण अस्पष्ट


डॉक्टर आणि पोलिसांना पाचारण केल्यानंतर तिच्या आईच्या वेणीचे कापलेले केस बेडरुममध्ये पडलेले होते. डॉक्टरांच्या उपचारानंतर राजकुमारी शुद्धीवर आल्या. एका बाईने आपले केस कापल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र तिला रोखण्यापूर्वीच ती पसार झाली. हा प्रकार भरदिवसा घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी महिलांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे.

व्हायरल सत्य : महिलांचे केस कापणाऱ्या मांजरीमागील खरी कहाणी


महिला रात्री झोपेत असताना त्यांचे केस कापल्याची घटना सर्वात आधी दिल्लीजवळच्या गुरुग्रामध्ये घडली होती. त्यानंतर भिवंडीनंतर डोंबिवलीत या घटनांची पुनरावृत्ती होत आहे. महिलांचे केस कापणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात अद्याप पोलिस अपयशी ठरले आहेत.