डोंबिवली : स्मृतिभ्रंश झाल्याने दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई लॉकडाऊनमुळे सापडल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. विशेष म्हणजे या आईची मातृदिनाच्या पूर्वसंध्येलाच तिच्या मुलाशी भेट झाली. सामाजिक कार्यकर्त्यांची प्रयत्न आणि मनसे आमदार राजू पाटील यांचं पाठबळ मिळाल्याने माय-लेकाची भेट झाली.


लॉकडाऊनच्या काळात डोंबिवलीच्या पलावा जंक्शन परिसरात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते समीर कोंडाळकर, हसन खान आणि भास्कर गांगुर्डे हे धान्यवाटप करत होते. त्यावेळी एक वृद्ध महिला त्यांच्या निदर्शनास आली. ही महिला वागण्या-बोलण्यावरुन चांगल्या घरातली वाटत असल्याने कार्यकर्त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी तिचा स्मृतिभ्रंश झाल्याचं लक्षात आल्याने, त्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना ही बाब सांगितली. त्यावेळी त्यांनी तिला एका वृद्धाश्रमात पाठवलं, मात्र लॉकडाऊनमुळे तिथे तिला प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते हसन खान यांनी या महिलेला स्वतःच्या घरी नेलं. तिच्याशी बोलताना तिने स्वतःचं नाव हर्षा ठक्कर आणि मुलाचं नाव तेजस ठक्कर असल्याचं तसंच आपण पुण्यात राहात असल्याचं सांगितलं. इतक्या माहितीवरुन पलावा सिटीतील रहिवाशांनी तिच्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली.


या महिलेचा मुलगा तेजस ठक्कर पुण्याला आयटी कंपनीत काम करत होता. या माहितीच्या आधारे फेसबुक प्रोफाईल शोधून पलावाच्या रहिवाशांनी तेजस ठक्कर यांच्याशी संपर्क साधला. आईचा फोटो पाठवला. त्यावेळी ही आपलीच आई असून दोन वर्षांपूर्वी हरवल्याचं तेजस यांनी सांगितलं. तसंच आपण सध्या गुजरातच्या बडोद्याला राहात असल्याचं सांगत आईला घ्यायला यायची तयारीही त्यांनी दर्शवली, मात्र अडथळा होता तो लॉकडाऊनचा.


या काळात हसन शेख हे दररोज तेजस आणि त्याच्या आईचं व्हिडीओ कॉलवर बोलणं करुन देत होते. तर दुसरीकडे डोंबिवलीचे मानपाडा पोलीस आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे ट्रॅव्हल पाससाठी प्रयत्न करत होते. अखेर गुजरात पोलिसांनी परवानगी दिल्यावर 8 मे रोजी तेजस ठक्कर डोंबिवलीत दाखल झाले आणि मातृदिनाच्या आदल्या दिवशीच दोन वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या आईची आणि मुलाची भेट झाली.


आई पुन्हा भेटेल ही आशा सोडून दिलेल्या तेजसला पलावा सिटीच्या जागरुक नागरिकांमुळे त्याची आई परत मिळाली, आणि अखेर सर्वांचा निरोप घेत आणि आभार मानत ही मायलेकाची जोडी गुजरातकडे रवाना झाली ती यंदाचा मातृदिन आयुष्यभरासाठी लक्षात ठेवत.