कल्याण : डोंबिवलीतल्या अवैध शस्त्रसाठाप्रकरणी अटकेत असलेला भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याला आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे कुलकर्णीच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून त्याने लगेचच आपल्या वकिलांमार्फत जामिनाचा अर्ज दाखलही केला
डोंबिवलीतील धनंजय कुलकर्णीच्या 'तपस्या हाऊस ऑफ फॅशन' नावाच्या दुकानात घातक शस्त्रांचा मोठा साठा सापडला होता. त्यामुळे गुन्हे शाखेने त्याच्यावर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत गेल्या मंगळवारी अटक केली होती. मात्र कल्याण न्यायालयाने त्याला थेट न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
'एबीपी माझा'ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात जात कुलकर्णीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आज कुलकर्णीला पुन्हा एकदा कल्याण न्यायालयात हजार करण्यात आलं, यावेळी पोलिसांनी कुठलाही युक्तिवाद न केल्याने कुलकर्णीला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
कुलकर्णीला मीडियापासून वाचवण्यासाठी पोलिस त्याला घेऊन अक्षरशः पळून गेले. आजच्या निर्णयामुळे कुलकर्णीच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून त्याने लगेचच आपल्या वकिलांमार्फत जामिनाचा अर्ज दाखलही केला आहे, त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
कुलकर्णीने गेल्या तीन दिवसात पोलिस तपासात कुठलंही सहकार्य केलं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र असं असतानाही त्याच्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद का केला नाही? हा प्रश्न कायम आहे.
डोंबिवलीतील अवैध शस्त्रसाठा प्रकरण, धनंजय कुलकर्णीच्या जामिनाचा मार्ग सुकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2019 07:26 PM (IST)
डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला अवैध शस्त्रसाठा प्रकरणी पुन्हा एकदा कल्याण न्यायालयात हजार करण्यात आलं, यावेळी पोलिसांनी कुठलाही युक्तिवाद न केल्याने कुलकर्णीला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -