डोंबिवली : डोंबिवलीतील निर्जन  खंबाळपाडा रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी एका धाडसी कॉलेज विद्यार्थिनीने लुटारुशी जोरदार झुंज दिली. कॉलेज मधून परिक्षेचा निकाल घेऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यानीने केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे चोरट्याने ब्लेडने वार केले. त्यामुळे जखमी झालेल्या विद्यार्थिनीकडील नकली दागिने आणि परीक्षेच्या निकालासह चोरटा पसार झाला.
स्वरा सदाशिव पाठक असं जखमी विद्यार्थिनीचं नाव असून ती डोंबिवलीतील मिलापनगरमध्ये स्नेहमिलन सोसायटीत राहते. खंबाळपाड्यातील मॉडेल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीने 6 महिन्यांपूर्वी बीएमएसची परिक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल कॉलेजमधून घेऊन स्वरा घरी परतत होती. यावेळी काळ्या रूमालाने चेहरा झाकलेला चोरटा दुचाकीवरून स्वराच्या जवळ आला. त्याने स्वराकडील गळ्यातील चैन खेचुन पळण्याचा प्रयत्न केला. आपण पकडले जाऊ या भीतीमुळे लुटारूने ब्लेडने स्वरावर हल्ला केला. या हल्ल्यात डावा हातावर आणि पोटावर ब्लेडने वार झाल्यामुळे स्वरा जखमी झाली.



त्यामुळे संधी साधून विद्यार्थिनीकडील पर्स हिसकावून चोरटा पसार झाला. स्वराच्या गळ्यातील नकली चेन असल्याने नुकसान झाले नाही. खासगी दवाखान्यात प्रथमोपचार केल्यानंतर तिच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.