प्रामाणिकपणा... रिक्षाचालकानं विसरलेले लाखो रुपये ग्राहकाला केले परत!
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 06:07 PM (IST)
डोंबिवली: आजच्या काळातही माणसाने माणुसकी आणि प्रामाणिकपणा सोडलेला नाही. याचा प्रत्यय नुकताच डोंबिवली शहरात आला आहे. प्रभाकर मोरे या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षातील ग्राहकाने विसरलेली दीड लाख रुपयांची पिशवी प्रामाणिकपणे ग्राहकाला परत दिली. कृष्णा गोसावी या ग्राहकाने नुकतचं एक नवीन घरं घेतलं होतं, ज्याचा हप्ता भरण्यासाठी ही दीड लाखांची रक्कम आणली होती. पण रिक्षात पैसे हरवल्यामुळे ते दुःखी होते. पण समोर लाखो रुपये पडलेले असतानाही मोरे यांनी कोणताही मोह न दाखवता स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयात पैशाची बॅग जमा केली. यानंतर ही बॅग मूळ मालक कृष्णा गोसावी यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. एकीकडे काहीशा रुपयांसाठी चोरी सारख्या घटना घडत असताना मोरे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल डोंबिवलीतील नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.