राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशीत संबंधित डॉक्टरांवर हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. डॉ. शीतल कामत यांनी बाळ आणि त्याची आई किरण शर्मा यांना जुन्या नोटा असल्यामुळे प्रवेश नाकारला होता.
8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रुग्णालयात अनामत रक्कम म्हणून पाचशेच्या नोटा न स्वीकारल्यानं बाळाला जीव गमवावा लागला होता. 12 नोव्हेंबरला मुंबईतल्या गोवंडीमधील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली होती. मयत नवजात बालकाचे वडील जगदीश शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीमध्ये काय?
नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसात बाळाला गोवंडीमधील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्यावेळी बाळाचे पालक डॉक्टरांना जुन्या नोटा देत होते आणि नवीन नोटा बदलून आणण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी करत होते, असं स्पष्ट दिसत असल्याचं चौकशी समितीवर असलेल्या डॉ. पवार यांनी 'मुंबई मिरर'ला सांगितलं.
'डॉ. कामत यांनी त्यांचं कर्तव्य बजावण्यास नकार दिला. इमर्जन्सी पाहता त्यांनी बाळ आणि आईला रुग्णालयात दाखल करुन घ्यायला हवं होतं. मात्र त्यांनी दाखवलेलं वर्तन अमानुष आहे.' असंही डॉ. पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे अहवाल सुपूर्द केल्यानंतर ते योग्य कारवाई करतील, असंही डॉ. पवारांनी सांगितलं.
एप्रिल 2016 पासून किरण शर्मा डॉ. कामतांकडे तपासणीला जात होत्या. 8 नोव्हेंबरला शर्मा यांना बाळाची डिलीव्हरी 7 डिसेंबरला होईल, असं सांगण्यात आलं. मात्र 9 तारखेला सकाळी त्यांना प्रसववेदना सुरु झाल्या आणि बाळाचा जन्म झाला.
सहा हजार रुपयांची रक्कम शंभर किंवा त्याखालील किमतीच्या नोटांच्या स्वरुपात भरण्यास बाळाच्या वडिलांनी असमर्थता दाखवल्याने डॉ. कामत यांनी बाळ-बाळंतीणीला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर बाळाचा मृत्यू झाला.