नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर काही महत्वाच्या ठिकाणी जुनी पाचशेची नोट स्विकारली जात होती. मात्र आजपासून जुनी नोट स्वीकारण्याची मुभा दिलेल्या ठिकाणांमधून पेट्रोल पंप, विमान तिकीट आणि गॅस यांना वगळण्यात आलं आहे.
विमान तिकीटासाठी नॉन कॅश फॅसिलिटी आणि स्वाईप सुविधा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर पेट्रोल पंपांवर गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास आल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नोटाबंदीनंतर महत्वाच्या ठिकाणी सरकारने जुन्या नोटा स्विकारण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली होती. मात्र 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल पंप आणि विमान तिकीटांसाठी जुन्या पाचशेच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत.
दरम्यान अन्य महत्वाच्या ठिकाणी जुन्या पाचशेच्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्विकारल्या जाणार आहेत. यामध्ये रेल्वे, एसटी, रुग्णालये, शाळेची फी, प्रीपेड मोबाईल रिचार्ज यांसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.
1000 रुपयांच्या नोटांचा व्यवहारातील वापर तर यापूर्वीच म्हणजे 24 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आला आहे.
देशभरात टोल पुन्हा सुरु
राज्यासह देशभरात आजपासून पुन्हा टोलवसुलीला सुरुवात झाली आहे. नोटाबंदीनंतर सरकारने 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफीची घोषणा केली होती. मात्र ही मुदत 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संपल्याने आज टोलनाक्यावर पुन्हा वसुलीला सुरुवात झाली आहे.
वसुलीमुळे टोलनाक्यांवर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे 200 रुपयांच्या वर टोल असल्यास 500 ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र टोल 200 रुपयांपेक्षा कमी असल्यास सुट्टेच पैसे द्यावे लागणार आहेत.
मात्र यामध्ये काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोलनाक्यावर 15 डिसेंबरपर्यंत जुनी नोट देता येणार आहे.
24 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, हजार रुपयांच्या नोटा बँकाशिवाय अन्य ठिकाणी स्वीकारण्याला मनाई करण्यात आली असली, तरी पेट्रोल पंप तसंच विमान प्रवासांच्या तिकीटासाठी त्याचा वापर करण्याची मुभा देण्यात आली होती. ही मुभा 15 डिसेंबरपर्यंत असेल, असंही त्याचवेळी जाहीर करण्यात आलं होतं.
24 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थ व्यवहार सचिवांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, देशभरातील टोल नाके 2 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार होते, त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तो आदेशही रद्द झाला आहे.
3 डिसेंबरपासून म्हणजेच 2 आणि 3 तारखेच्या मध्यरात्री टोलनाके सुरु होतील, मात्र तिथे पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.
अगदी सुरुवातीला म्हणजे 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा निर्णय जाहीर करताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी फक्त 72 तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र नंतर टप्प्याटप्प्याने ही मुदत तब्बल पाचवेळा वाढवण्यात आली.
आताच्या नव्या निर्णयानुसार, पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा, 3 डिसेंबरपासून फक्त टोलनाके आणि पेट्रोलपंपावर स्वीकारल्या जाणार नाहीत.
इथे मुदत कायम
त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महापालिकांची थकबाकी किंवा पाणीपट्टी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये भरण्यासाठी आधी दिलेली 15 डिसेंबरची मुदत कायम राहणार आहे.
तसंच रेल्वे प्रवासाच्या तिकीटासाठीही जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.
थोडक्यात, जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी आधी परवानगी दिलेल्या ठिकाणांपैकी जी ठिकाणे थेट सरकारच्या अधिपत्याखाली येतात किंवा ज्यामध्ये खाजगी क्षेत्रांचा सहभाग नसेल, तिथेच फक्त 15 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारल्या जातील.
टोलनाके, पेट्रोलपंप किंवा विमान वाहतूक कंपन्या यांच्यावर सरकारचं थेट नियंत्रण नसल्यामुळे कदाचित त्यांना जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास 3 डिसेंबरपासून मनाई करण्यात आली असावी.
टोलनाके, पेट्रोलपंप किंवा विमान वाहतूक कंपन्यांचं तिकीट बुकिंग याठिकाणी जुन्या नोटांच्या आदलाबदलीत मोठे गैरप्रकार होत असल्याच्या संशयावरुन हा निर्णय घेतला असण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत.
नोटाबंदीनंतर 500 च्या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेत बदलू शकता. तसंच 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेतही जुन्या नोटा बदलू शकता.