मुंबई : फेसबुकवर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरविरोधात पोस्ट करणे एकाला महागात पडलं आहे. याप्रकरणी मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टर असेल्या सुनीलकुमार निषाद नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत डॉ. सुनीलकुमार निषाद यांच्याविरोधात रवींद्र तिवारी नामक व्यक्तीने शनिवारी मुंबईतील विक्रोळीमधील पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर आय.पी.सी कलम 295 (A) अंतर्गत डॉ. निषाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी निषाद यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
निषाद हा विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात राहतो. घराजवळच त्याचे एक क्लिनिकदेखील आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन हिंदू धर्म, हिंदू देवता आणि ब्राम्हण समाजाबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या पोस्ट करत होता. त्यामुळे या विभागातील नागरिकांमध्ये त्याच्यावरिधात प्रचंड नाराजी होती.
वारंवार निषादला समजावूनदेखील त्याचे अशा प्रकारचे पोस्ट्स टाकणे सुरुच होते. त्यामुळे याच विभागातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात 11 मे रोजी कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर निषाद क्लिनिक बंद ठेवून फरार झाला होता. तरीदेखील त्याचे अशा प्रकारचे पोस्ट्स टाकणे सुरुच होते. त्यानंतर विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी बुधवारी त्याला फोर्ट परिसरातून अटक केली. आज न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. निषादवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
साध्वी प्रज्ञाविरोधात फेसबुक पोस्ट टाकणं महागात, मुंबईतल्या डॉक्टरला बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2019 07:56 PM (IST)
फेसबुकवर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरविरोधात पोस्ट टाकणे एकाला महागात पडलं आहे. याप्रकरणी मुंबईतील एका होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -