मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थांचे आंदोलन मिटवण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे. परंतु अध्यादेश काढण्याच्या कामात निवडणूक आयोगाचा अडथळा येत होता. हा अडथळा बाजूला होण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोगाने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची परवानगी दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अध्यादेशाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बैठक पार पडली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन यांनी आध्यादेशाबाबत भाष्य केले होते.

गिरीश महाजन यांनी सांगितले होते की, सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत असून याबाबत आम्ही 100 टक्के सकारात्मक आहोत. सर्वोच्च न्यायालयातूनही काही मार्ग निघतो का याची चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करत आहोत. मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाशी चर्चा सुरु आहे.