No Gatari at Police Station : पोलीस स्टेशन, गुन्हा शाखा किंवा विशेष शाखा या ठिकाणी गटारी (Gatari) साजरी करु नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी ताकीद मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आली आहे. पोलीस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल न करण्याच्या सूचना मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. ही प्रथा बंद करावी अशा सूचना पोलीस दलाच्या वतीने जारी केलेल्या पत्रकात देण्यात आल्या आहेत


प्रत्येक पोलीस उपायुक्तांना पोलीस ठाण्यात तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल अथवा करुन गटारी साजरी होणार नाही याकडे लक्ष ठेवावे असे निर्देश देण्यात आले आहेत.


पुढील आठवड्यातील शुक्रवार म्हणजेच 29 जुलै 2022 पासून श्रावण महिना सुरु होत आहे. तत्पूर्वी गुरुवारी 28 जुलै 2022 रोजी आषाढी अमावास्या आहे. आषाढी अमावास्येला 'गटारी' म्हणूनही संबोधण्यात येते. मुंबईतील पोलीस ठाणे/ शाखा/कार्यालये इत्यादी ठिकाणी श्रावण महिना सुरु होण्याअगोदर साधारणतः 2 ते 3 दिवस "आषाढी अमावास्या गटारी " साजरी करण्याची प्रथा आहे.


परंतु पोलीस ठाणे/कार्यालयाच्या हद्दीत काही व्यक्ती अपघातात किंवा हत्येत मृत्युमुखी पडतात. कोंबड्या किंवा बोकडांचा बळी दिल्यामुळे अशा मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना शांती लाभते, अशी धारणा असल्याने कोंबड्या किंवा बोकडांचा बळी देण्याची प्रथा आहे. बळी दिलेल्या कोंबड्या किंवा बोकडांचे जेवण तयार करुन पोलीस ठाणी/शाखा कार्यालयातील कर्मचारी वर्गाला "प्रसाद" म्हणून वाटण्यात येतो. 


मात्र या प्रथेला प्राणी संरक्षण संघटनांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे. पोलीस दल हे समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असल्याने पोलिसांनी स्वतःकायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. पोलीस ठाणे हे 'सार्वजनिक जागा' या संज्ञेखाली येतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्राणीमात्रांची कत्तल करणे हे बेकायदेशीर असून अशी कृत्ये करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरते, असं या पत्रकात म्हटलं आहे.