मुंबई: सकारात्मक ज्ञानाचा स्रोत असलेल्या ज्ञानेश्वरीचे ज्ञान अंध बांधवांना व्हावे यासाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे ब्रेल लिपीत रुपांतर करण्यात आले आहे. हा अनोखा उपक्रम 'दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनने हाती घेतला आहे. आज शिवसेनाभवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा पार पडला.


दैनिक सामनाचे संपादक खासदार संजय राऊत आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

जीवनाचं सार सोप्या भाषेत समजावणाऱ्या ज्ञानेश्वरीचे वाचन अंधबंधवांना करता यावे, यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चार अध्याय ब्रेल लिपीत रूपांतरित करण्यात आले आहेत.

कीर्तन, निरुपणाच्या माध्यमातून अंधबंधवांना ज्ञानेश्वरी ऐकता येते. मात्र त्याचे वाचन किंवा अभ्यास करण्यासाठी जास्त साधनं उपलब्ध नाहीत. हे जाणून हा अनोखा उपक्रम ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनाइझेशन तर्फे हाती घेण्यात आला.

रोजच्या आयुष्यातील नैराश्य दूर करून संतांचे विचार आचरणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याने, अंधबांधवांमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता आहे. त्याचे वाचन सोयिस्कर करता यावे यासाठी पाहिले तीन अध्याय शंभर पानी आणि अठरावा अध्याय 80 पानी केला आहे.

विशेष म्हणजे सध्या डोळस व्यक्तींना ग्रंथांचे वाचन आणि संतांचे विचार आत्मसात करायला वेळ नसताना, अंधांमध्ये यासाठीची गोडी खरंच अपल्यासारख्यांचे डोळे उघडणारीच म्हणावी लागेल.