मुलीच्या लग्नपत्रिकेत नाव टाकण्याचा वाद विकोपाला, नवऱ्याकडून बायकोची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2019 07:38 AM (IST)
काही दिवसावर येऊ ठेपलेल्या लग्नाच्या आधी बायकोची हत्या करून पित्याने लग्न असलेल्या मुलीलाही जखमी केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच या पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : लग्नात मानपानाच्या गोष्टी जीवावर येऊ लागल्या आहेत. कल्याणमध्ये अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नपत्रिकेत नावं टाकण्याचा वाद विकोपाला जाऊन नवऱ्याने बायकोची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने काही दिवसावर लग्न आलेल्या घरात शोककळा पसरली आहे. काही दिवसावर येऊ ठेपलेल्या मुलीच्या लग्नाच्या आधी बायकोची हत्या करून पित्याने लग्न असलेल्या मुलीलाही जखमी केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहन महाजन असं पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. मोहन आणि त्याची पत्नी मनीषा यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे मोहन हा एकटाच वेगळा राहत होता. मात्र मे महिन्यात त्याच्या मुलीचं लग्न असल्यानं तो पत्नीसोबत राहायला आला होता. गुरुवारी रात्री मुलीच्या लग्नपत्रिकेत टाकलेली नावं आणि मानपान यावरून पती पत्नीमध्ये वाद झाले आणि त्यातून मोहन याने पत्नी मनीषाची चाकूने भोसकून हत्या केली. यावेळी आईला वाचवायला आलेल्या मुलीवरही त्याने चाकूने 6 वार केले. या घटनेनंतर मोहन पळून गेला होता, मात्र बाजारपेठ पोलिसांनी काही तासातच त्याला सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.