नालासोपारा : जेट एयरवेजच्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नालासोपारा येथे समोर आली आहे. शैलेशकुमार सिंह असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नालासोपारा पूर्व ओसवाल नागरी येथील साई पूजा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन शैलेशकुमार यांनी आत्महत्या केली.


शैलेशकुमार गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात होते. जेट एअरवेजने गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याने ही परिस्थिती त्यांच्यावर ओढावली होती, असा दावा जेट एअरवेजच्या स्टाफ अँड एम्प्लॉईज असोसिएशनने केला आहे. शैलेशकुमार यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुली आणि 2 मुले आहेत.


शैलेशकुमार सिंह यांना लिव्हर कॅन्सर असल्याची माहिती पोलिसांमार्फत समोर आली आहे. कन्सर सारख्या गंभीर आजाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांनी तक्रारीत म्हटलं आहे. तुलिंज पोलीस ठाण्यात याबाबत आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.


बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. 17 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती.


जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.