Anil Parab : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. त्यानंतर अनिल परब यांनी बॅग भरण्याची तयारी करावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया सोमय्या यांनी व्यक्त केली. त्यानंतर आता ईडीकडून अनिल परब यांना अटक होणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनिल परब यांना अटक झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अनिल परब हे महत्त्वाचे नेते आहेत. 


>> अनिल परब शिवसेनेसाठी महत्त्वाचे का?


मागील अनेक वर्षांपासून अनिल परब शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे समजले जातात. मुंबई महापालिका निवडणुकांच्यादृष्टीने अनिल परब यांची महत्त्वाची भूमिका असते. अनिल परब हे अनेक वर्ष शिवसेनेप्रणित केबल सेनेचे अध्यक्ष होते. 


अनिल परब यांची मुंबईतील वॉर्ड निहाय समीकरणावर विशेष पकड आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेच्या रणनीतीमध्ये परब यांची मोठी भूमिका असते. 


मागील 2017 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. राज्यातील सत्तेत एकत्र असताना शिवसेना आणि भाजपने ही वेगवेगळी निवडणूक लढवली होती. काही समीकरणे शिवसेनेच्या विरोधात असतानाही शिवसेनेने ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीच्या विजयात अनिल परब यांचा मोठा वाटा होता.


अनिल परब यांना पक्षाकडून 2012 मध्ये विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते. त्याआधी वांद्रे येथील पोटनिवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव करण्यात परब यांची मोठी भूमिका होती. परब हे 2017 मध्ये शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते झाले होते. त्यानंतर त्यांना पक्षाने पुन्हा 2018 मध्ये विधान परिषदेवर पाठवले.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनिल परब यांना परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.


>> शिवसेना लक्ष्य?


केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही मातब्बर नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.