मुंबई : लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये थांबलेली बोलणी आजपासून पुन्हा सुरु होत आहे. राज्यातील आठ जागांबाबत आघाडीचा निर्णय होणे बाकी आहे.

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेग देण्याचे ठरवले आहे. दोन्ही पक्षांमध्ये राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित 8 जागांसंदर्भातील चर्चा सुरु होणार आहे.

काही जागांची अदलाबदल तर काही जागा मित्रपक्षांना सोडण्यासंदर्भात दोन्ही पक्षात चर्चा होईल. राष्ट्रवादीने 50-50 टक्के जागावाटपाची मागणी केली होती. मात्र राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश काँग्रेसने जिंकल्यामुळे राज्यातील जागावाटपामध्ये काँग्रेस आक्रमक राहण्याची शक्यता आहे.

या आठ जागांबाबत अद्याप निर्णय नाही

पुणे, अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, औरंगाबाद, यवतमाळ, नाशिक, जालना, नंदुरबार

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितल्याचंही म्हटलं जातं.