मुंबई : 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, अशी खात्रीही शाह यांना वाटते. अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली.


विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक भ्रम आहे, असा घणाघात करताना अमित शाहांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा केंद्रात सत्ता मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला. 'महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत आम्ही त्या सर्वांचा पराभव केला होता. ते सर्व प्रादेशिक नेते आहेत आणि एकमेकांना साथ देऊ शकत नाहीत' असंही अमित शाहांना वाटतं.

शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, असा विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला. शिवसेनेसोबत बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शाह-फडणवीसांची बैठक, शिवसेनेशी जाहीर वाद टाळण्याची भूमिका?

2019 मध्ये भाजप पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यं आणि ओदिशातही सत्ता मिळवेल, असा विश्वासही अमित शाह यांना वाटतो. 2014 मध्ये भाजपची केवळ सहा राज्यांत सत्ता होती, आता 16 राज्यांत आहे. मग 2019 मध्ये निवडणुका कोण जिंकेल? असा प्रतिप्रश्न अमित शाहांनी उपस्थित केला.

'राष्ट्रीय सुरक्षेबाबत आम्ही बाळगलेली हमी, भ्रष्टाचाराचा केलेला नायनाट, आठ कोटी घरांमध्ये शौचालयाची व्यवस्था आणि अडीच कोटी घरांमध्ये वीज उपलब्ध करुन दिली. या मुद्द्यांच्या आधारे आम्ही निवडणूक लढवणार' अशी माहिती अमित शाहांनी दिली. 'मजबूत सरकार सत्तेत येणं ही फक्त भाजपचीच नाही, तर देशाचीही गरज आहे' असं शाह म्हणाले.

'राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांतील निकाल भाजपच्या बाजूने नसले, तरी लोकसभा निवडणुकांशी त्यांचा संबंध जोडणं चुकीचं ठरेल' असंही अमित शाह म्हणाले. नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणीही असो, आम्ही आमच्या बलस्थानांवर जिंकू, अशी खात्री शाहांना वाटते.