Dindoshi sessions court : अंधेरीतील साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कारकरून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला (45) दिंडोशी सत्र न्यायालयानं सोमवारी मोहन चौहान दोषी सिद्ध केलं आहे. येत्या बुधवारी मोहनला काय शिक्षा द्यायची यावर युक्तिवाद केला जाणार आहे.


गेल्यावर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली होती. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री एक 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर काही तासांच्याआतच मुंबई पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक करण्यात आली होती. मोहनवर भारतीय दंड संहितेच्या विविध  कलमांतर्गत बलात्कार, हत्या, एट्रोसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. अवघ्या 18 दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं


346 पानांच्या या आरोपपत्रात काही गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळख होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमाने तिच्यासोबत अमानुष कृत्य केले. ज्यात लोखंडी सळीच्या सहाय्यानं त्यानं त्या महिलेची आतडी बाहेर काढली होती. हे कृत्य पूर्वनियोजित नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी हा तपास तातडीनं पूर्ण केला. या आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून एट्रोसिटी, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याच आधारावर आरोपी मोहन चौहानला दोषी सिद्ध करत असल्याचं सोमवारी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून येत्या 1 जूनला मोहनला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.