मुंबई: 2008 मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी इलेट्रिशिअन असलेल्या दिलीप पाटीदार यांना महाराष्ट्र एटीएसनं 16 नोव्हेंबर 2008 साली इंदूरमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. घटनेला 8 वर्षे उलटली. त्यावेळी सहा महिन्याचा असलेला त्यांचा मुलगा हिंमाशू आता आठ वर्षाचा झाला आहे. पण अजूनही दिलीप पाटीदार यांचा थांगपत्ता लागला नाही.


 

दिलीप पाटीदार यांच्या शोधासाठी कुटुंबियांनी मुंबईत खेटे मारले. कोर्टात धाव घेतली. अखेर सीबीआयनं चौकशी केली. एटीएसच्या तीन अधिकाऱ्यांना दोषी धरलं पण अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

 

2008च्या मालेगाव स्फोटातील आरोपींवरील मोक्का हटवला पण फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दिलीप पाटीदारांचा मात्र थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे पाटीदार कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एटीएसच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

 

शंभर दोषी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये. हे आपल्या न्याय व्यवस्थेचं धोरण. पण तपास यंत्रणेनं फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दिलीप पाटीदार यांचं काय केलं? याचं उत्तर अजूनही मिळत नाही.

 

8 वर्षाच्या हिंमाशूनं वडिलांशिवाय, पत्नीनं पतीशिवाय काढलेली आठ वर्षे जगातील कुठलीही यंत्रणा परत देऊ शकणार नाही. पण याप्रकरणातील एटीएसच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई तरी होणार का हा प्रश्न आहे.