मुंबई : मुंबईतील एका उच्चभ्रू वसाहतीतील घरातून चक्क चार ट्रक, सहा टेम्पो भरुन कचरा बाहेर काढण्यात आला. धक्कादायक आणि मन सून्न करणारी गोष्ट म्हणजे घरातील मुलानेच जन्मदात्या आईला कचऱ्यात डांबून ठेवलं होतं. मुंलुंड पश्चिमेकडील झवेर मार्गावर असलेल्या गाइड इमारतीत ही घटना घडली.


 

 

या इमारतीत राहणाऱ्या सावला कुटुंबाने गेल्या 13 वर्षांपासून घरात कचरा साठवला होता. सोसायटीतील लोकांनी वारंवार तक्रार देऊनही सावला कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केलं. याशिवाय सावला कुटुंबातील आई 86 वर्षीय मणिबेन या गेल्या काही दिवसांपासून दिसत नव्हत्या. त्यामुळे शेजाऱ्यांनी अखेर पोलिस आणि महापालिकेला पाचारण केलं. इमारतीतील रहिवाशांनी यासाठी सामाजिक कार्यकर्ते विरल शहा यांची मदत घेतली

 

 

महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा उपसण्यात आला. तेव्हा तब्बल चार ट्रक आणि सहा टेम्पो भरुन कचरा निघाला. पण पालिका कर्मचारी तेव्हा हैराण झाले जेव्हा या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना वयोवृद्ध महिला सापडली. ही महिला म्हणजे 86 वर्षीय मणिबेन होती.

 

 

गाइड इमारतीत एकूण 12 घरं आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर चुनीलाल सावला याचं कुटुंब राहतं. तीन मुलं, तीन मुली आणि त्यांची पत्नी मणिबेन असं हे कुटुंब. काही वर्षांपूर्वी चुनीलाल, एक मुलगी आणि मुलाचं निधन झालं. त्यामुळे सावला कुटुंबामध्ये वयाची साठी पार केलेली चार भावंडं आहेत आणि या चारही जणांना कचऱ्याचा संग्रह करण्याचं विक्षिप्त छंद जडला.

 

 

परंतु त्यांच्या छंदाचा त्रास इतरांना होऊ लागला. रोजच्या खाण्यातले पदार्थ, प्लास्टिक, सिलेंडर, कपड्याच्या चिंध्या अशा अनेक वस्तू घराच्या बेडरूममध्ये टाकण्यात आल्या होत्या. ज्या कचऱ्याची दुर्गंधीने इमारतीतल्या इतरांना त्रास होत होता, त्या कचऱ्यातच या भावंडांनी स्वतःच्या आईला मरण यातना भोगण्यासाठी ठेवलं होतं.

 

 

पोलिसांनी कारवाई केली तेव्हा सावला भांवडं दुसरीकडे राहायला गेली होती. पोलिसांनी बेडरुमची ग्रील तोडून कचऱ्याच्या ढीगाऱ्यात बसलेल्या वृद्ध मणिबेन यांची सुटका केली. सध्या माणिबेन यांना उपचारासाठी एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

 

आयुष्यभर मुलांना स्वच्छ, निरोगी आणि चांगलं आयुष्य देण्यासाठी धडपडणाऱ्या या माऊलीला तिच्या मुलांनी असं किड्या-मुंग्यांचं आयुष्य जगण्यासाठी भाग पाडलं होतं.