नवी मुंबई : दिघावासियांच्या घरांसाठी राज्य सरकार येत्या सोमवारी सुप्रीम कोर्टात जाईल, असं आश्वासन शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे. त्यामुळे दिघावासियांना तूर्तास दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर दिघ्यातल्या घरांसाठी अध्यादेश काढू, असंही राजन विचारे यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सांगितलं आहे.
हायकोर्टानं नवी मुंबईतल्या घरांना अनधिकृत ठरवत लोकांना घरं सोडण्याचे आदेश दिले आहेत. कँपाकोलासाठी सर्व कायदेविषयक बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या सरकारनं दिघ्यासाठी मात्र दुजाभाव केल्याचा आरोप आहे. याशिवाय आश्वासन मिळाल्यानंतरही आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धार दिघावासियांनी केला आहे.
दुसरीकडे दिघ्यात मात्र राजकीय स्टंटबाजीचा खेळ रंगताना दिसत आहे. मूळ प्रश्नाला बाजूला ठेवत दिघ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं परस्परविरोधी घोषणा देण्यातच स्वारस्य मानल्याचं चित्र आहे.
दोन दिवसात घरं रिकामी करण्याचे आदेश मिळाल्यानं दिघावासियांनी आज ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मात्र, त्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी येऊन एकनाथ शिंदेंविरोधात घोषणा दिल्या. यानंतर शिवसेनेनंही राष्ट्रवादीच्या गणेश नाईक आणि संदीप नाईक यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली.