Mumbai University Chancellor : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) येथील कुलगुरु प्रा. दिगंबर शिर्के (Digamabar shirke) यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai Vidyapeeth) कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला. कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ संपत असताना रिक्त पदी कुलगुरुची निवड प्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 2 ते 3 महिन्याचा अवधी लागणार आहे. मात्र, तोपर्यंत कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के हे अतिरिक्त कारभार प्रभारी म्हणून पाहणार आहेत.
मावळते कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी प्रा. दिगंबर शिर्के यांना कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविला. याप्रसंगी मावळते प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अजय भामरे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. राजेश खरात, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा मजूमदार, वित्त व लेखा अधिकारी प्रा. (सीए.) प्रदीप कामथेकर यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
फोर्ट संकुलातील व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के म्हणाले की, मुंबई विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ असून या विद्यापीठाची धुरा आपल्या खांद्यावर सोपविल्याबाबत त्यांनी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांचे आभार मानले.
शिर्के म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाचा ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध परंपरा अविरतपणे जोपासली आहे. ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, विविध प्राधिकरणांच्या निवडणुका, परीक्षा पद्धती आणि कोविडच्या प्रभावामुळे प्रभावित झालेले अॅकेडमिक कॅलेंडर ही प्राथमिकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिर्के मूळचे हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फे वडगावचे
शिर्के हे मूळचे हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फे वडगाव येथील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस.सी केले. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठातून एम.फील आणि पी.एचडी केली. त्यानंतर ते याच विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विभागप्रमूख, प्रभारी कुलसचिव, प्र-कुलगुरू या पदांवर त्यांनी काम केले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI